सचिन वाझे प्रकरणामुळं भाजपनं महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करुन त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. या घडामोडींनंतर भाजपनं अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून भाजप आमदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘सचिन वाझे आणि परमबीर सिंह फक्त हे प्यादे आहेत. ते खरे सूत्रधार नाहीत. २०१४ ते २०१९ मध्ये जेव्हा शिवसेना- भाजपचं सरकार होतं तेव्हा उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेंना परत घ्या म्हणून फडणवीसांकडे आग्रह धरला होता. आत्ता झालेल्या अधिवेशनात सचिन वाझेंना निलंबित करण्यासाठी तयार नव्हते. उद्धव ठाकरे त्यांची वकिली करत होते. त्यामुळं आता हे स्पष्ट झालं आहे की सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांचा बॉस कोण आहे. राजकीय आशीर्वाद कोणाचा होता हे आता सरळ स्पष्ट आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. जर या दोघांची बदली होत असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.
सचिन वाझेंनी पब्लिसीटीसाठी कट रचला?
‘एनआयए ही देशातील सर्वोच्च तपासयंत्रणा आहे त्यामुळं सचिन वाझे कोणासाठी पब्लिसीटी करत होते?, कोणासाठी हे कृत्य केलं?, तीही सगळी माहिती त्यांनी दिली आहे. फक्त ती आता टप्प्याटप्याने बाहेर येईल. पण सचिन वाझे हे फार छोटे आहेत त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. तेव्हाच देशविरोधात कोण कारवाई करत होते हे स्पष्ट होईल,’ असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times