एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत बोलत होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले आहे. महाराष्ट्रात झालेला प्रयोग हा उत्तम प्रयोग असल्याचे ते म्हणाले. या प्रयोगाकडे संपूर्ण देश पाहतो आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे पुनर्गठन करायला पाहिजे असे आम्ही वारंवार म्हणत आहोत, असे राऊत म्हणाले.
आपण यूपीएबाबत बोलत आहात, मात्र आपण यूपीएचे घटक पक्ष नाही आहात, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्ही आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून () बाहेर पडलेलो आहोत. आम्हीच नाही, तर अकाली दल देखील एनडीएमधून बाहेर पडला आहे. ममता बॅनर्जी तर यूपीएमध्येही नाहीत आणि एनडीएमध्येही नाहीत. देशात असे अनेक पक्ष आहेत जे किंवा एनडीएत नाहीत असे सांगत, आता हे पक्ष यूपीएमध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
संयुक्त पुरोगामी आघाडी मजबूत असल्याखेरीज काँग्रस पक्ष मजबूत होणार नसल्याचे राऊत म्हणाले. यूपीएला मजबूत करायचे असल्यास जो नेता अॅक्टीव्ह आहे आणि ज्या नेत्याच्या नावावर विरोधकांमध्ये सहमती असेल अशा नेत्याच्या हाती यूपीएचे नेतृत्व दिले गेले पाहिजे, असे राऊत म्हणाले. त्यावर असा कोण नेता आहे, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर सध्या तरी केवळ शरद पवार यांचेच नाव समोर येत आहे, असे उत्तर दिले. काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारायला हवे असेही ते म्हणाले.
शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवल्यास यूपीए मजबूत होईल, असा विश्वास आपल्याला असल्याचेही राऊत म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times