परभणी: मागील विधानसभा निवडणुकीवेळी साताऱ्यात भरपावसात भाषण करत होते. ते दृश्य पाहून महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण या ‘८० वर्षांच्या तरुणा’च्या प्रेमात पडला होता. पवार यांच्या सभेतील फोटो अनेक तरुणांनी व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले होते. तेच शरद पवार अचानक विमान प्रवासात बाजूला बसले तर…परभणीच्या एका तरुणाला विमानात शरद पवार यांच्या बाजूला बसून प्रवास करण्याची संधी मिळाली आणि ‘साहेब’ बाजूला बसल्यानं तो भारावून गेला.

असं या तरुणाचं नाव आहे. परभणीतील गंगाखेडमधील महिराळ येथे तो राहतो. पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असून, शिक्षकाच्या नोकरीसह शेती करण्याची त्याची इच्छा आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यासोबत हा तरूण दिल्लीला गेला होता. परतीच्या प्रवासावेळी शुक्रवारी दिल्ली विमानतळावर खासदार जाधव आणि शरद पवार यांची भेट झाली. दोघेही व्हीआयपी कक्षात बोलत होते. त्याचवेळी ‘साहेबां’सोबत एक फोटो काढायचा आहे, अशी इच्छा सारंग यानं खासदार जाधव यांच्याकडे बोलून दाखवली. त्याचवेळी विमानात ते तुझ्या बाजूलाच बसतील, असं सांगितल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. विमानात पवार यांच्या बाजूलाच बसण्याचा योग आला. त्यामुळं दिल्ली-पुणे विमानप्रवासात माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता, असं सारंग म्हणाला.

पवार यांनी दिला शेती करण्याचा सल्ला

पवार साहेब बाजूला बसल्यानंतर थोड्या वेळानं त्यांना माझ्याबद्दल सांगितलं. त्यावेळी पवार यांनी माझी आपुलकीनं विचारपूस केली. शिक्षणाबद्दल विचारलं. नोकरीसोबत शेती करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला, असं सारंगनं सांगितलं. जळगावला केळीचं पीक चांगलं मिळतं, तेथून घेऊन ये, असंही त्यांनी मला सूचवलं.

अजूनही १० एकरात शेती करतात…

सारंग या तरुणाला शेती करण्याचा सल्ला देतानाच, मी अजूनही शेती करतो, असं पवार यांनी सांगितलं. १० एकर परिसरात ते अजून वेगवेगळी पीकं घेतात. दररोज २०० लीटर दूध डेअरीत जातं, असं सांगतानाच, शेतीसोबत जोडधंदाही करा, असा सल्लाही त्यांनी तरुणाला दिला.

विमानातून दिसणाऱ्या प्रत्येक भागाची माहिती देत होते…

हेलिकॉप्टरमधून फिरत असताना, शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना आकाशातून दिसणाऱ्या प्रत्येक भागाची माहिती देतात, असं अनेकांकडून ऐकलं आहे. पण परभणीतील सारंगला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. विमानातून दिसणाऱ्या प्रत्येक भागाची खडानखडा माहिती ते सारंगला देत होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here