अहमदाबाद, : इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने आज आपला संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये काही नवीन चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका पुण्यात खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील तीन सामने २३, २६ आणि २८ मार्च या दिवशी होणार आहेत.

भारताच्या या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे, त्याचबरोबर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहे. सलामीसाठी यावेळी रोहितबरोबर शिखर धवन हा पर्याय असेल, पण त्याचबरोबर युवा सलामीवीर शुभमन गिलला यावेळी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेत गिलला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल, असे म्हटले जात आहे.

भारताच्या मधल्या फळीमध्ये श्रेयस अय्यर आहे, त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला यावेळी वनडे संघातही स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांनाही यावेळी संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या संघात लोकेश राहुलचा यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या गोलंदाजीमध्ये एका युवा खेळाडूला पहिल्यांदाच संधी दिली आहे, या युवा वेगवान गोलंदाजाचे नाव प्रसिध कृष्णन असं आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात प्रसिधला बऱ्याचदा सर्वांनीच पाहिले असेल. त्याचबरोबर भारतीय संघात यावेळी अष्टपैलू कृणाल पंड्याचे पुनरागमन झाले आहे. फिरकीपटू अक्षर पटेलला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर रवींद्र जडेजा अजूनही दुखआपतीमधून पूर्णपणे सावरलेला दिसत नाही. त्यामुळे संघात एक डावखुरा फिरकीपटू असावा, म्हणून कृणाल पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

या संघात फिरकीची जबाबदारी युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि कृणाल पंड्या यांच्यावर असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची धुरा भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, टी. नटराजन आणि प्रसिध कृष्णन यांच्यावर असेल. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा या दोन्ही वेगवान गोलंदाजांना यावेळी विश्रांती दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here