देसवडे गावात गोविंद कानडे यांया शेतात एक संशयास्पद दुचाकी ग्रामस्थांना आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांनी तेथे पाळत ठेवली. रात्री आठच्या सुमारास दोघे चोरटे ती दुचाकी शेतातून बाहेर रस्त्यावर घेऊन आले. ती सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या हालचाली संसशयास्पद वाटल्याने ग्रामस्थांनी चौकशी केली. तेव्हा ते असून त्यांनी दुचाकी चोरून तेथे लपवून ठेवल्याचे लक्षात आले. त्यावर संगिता भोर, रामा गुंड यांनी चोरट्यांना पकडले. हे पाहून संतोष कानडे, पंढरीनाथ भोर, गेनभाऊ कानडे, सुनील गुंड मदतीला धावले. तोपर्यंत एक आरोपी संगिता भोर यांच्या पोटात ठोसा मारून पळून गेला. त्याचा पाठलाग केला, पण तो हाती लागला नाही. अंधाराचा फायदा घेत तो पळून गेला. एक आरोपी पोपट नाथु भुतांबरे (रा. शिंदेवाडी ता. संगमनेर) याला पकडून ठेवण्यात यश आले. ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावेही सांगितली.
ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. सहायक फौजदार शिवाजी कडूस पथकासह तेथे आले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्याच फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकूण चार जणांची ही टोळी असल्याची माहिती मिळाली. त्यातील दोघे संगमनेर तर दोघे पारनेर तालुक्यातील आहेत. पळून गेलेल्या आरोपीचे नाव पिंटू दुधावडे आहे. त्यानेच भोर यांच्या पोटात मारले. आरोपींनी चोरीची दुचाकी विकण्यासाठी तेथे आणल्याचे सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांचे वीज पंप चोरून विकण्याचे गुन्हे या टोळीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशा चोऱ्या करणारी मोठी टोळी असल्याची शक्यता शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी व्यक्त केली आहे. या टोळीतील फरार तीन आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या भागात शेतातील वीज पंपाच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्याला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई अवश्यक असल्याचे भोर यांनी म्हटले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times