सरकारी अधिकारीच करोनाच्या विळख्यात सापडत असल्याचं चित्र आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांना करोनाची लागण झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने फैलाव वाढत चालल्याचे मानले जाते. बुधवारी रात्री शहरातील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु तरीही संसर्ग अटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. आता तर, जिल्हा अधिकाऱ्यांनाच करोनानं गाठलं आहे.
वर्षा ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी अँटीजन टेस्ट केली होती. मात्र ती टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचे आज अहवाल आला आहे. त्यानुसार ठाकूर यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ठाकूर यांच्यासह अतिरीक्त सीईओ शरद कुलकर्णी, कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांच्यासह अनेकांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
नांदेड जिल्हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाच करोनाची लागण झाल्यानं आज जिल्हा परिषदेत शुकशुकाट पाहायला मिळाला आहे.
दरम्यान, नांदेडमध्ये बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. शिवाय खाजगी रुग्णालयांनाही उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. आठवडी बाजारावरही निर्बंध घालण्यात आले होते. वारंवार सूचना करूनही नागरिकांचा निष्काळजीपणा करोनाच्या फैलावाला कारणीभूत ठरत आहे. बुधवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, जिम तसेच दुकानांवर बंदी घातली. लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रम, खेळाचे मैदाने, स्विमिंग पुलांना टाळे घालण्याचे आदेश दिले. मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत याची अंमलबजावणी करण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले होते. या नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times