पेंटागॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्याच्या भारत दौऱ्याबाबत माहिती दिली होती. ऑस्टीन हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांची भेट घेतील आणि भारत-अमेरिकेतील मोठ्या संरक्षण सहकार्याला ठोस स्वरूप देण्यासंबंधीच्या मार्गांवर विचारविनीमय करतील. त्यात माहितीची देवाणघेवाण केली जाईल. संरक्षण करार, संरक्षणसंबंधी व्यापार आणि नवीन क्षेत्रात सहकार्य करण्याच्या मुद्याची समावेश असल्याचं हिंदी आणि प्रशांत महासागर सुरक्षासंबंधी सहायक कार्यवाहक संरक्षणमंत्री डेव्हीड एफ हेलवी यांनी सांगितलं होतं.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि लॉयड जे. ऑस्टीन यांच्यात शनिवारी बैठक होईल. या बैठकीत भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली जाईल. तसंच चीनच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर हिंदी आणि प्रशांत महासागर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. तसंच अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापिक करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली जाईल, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये क्वाडच्या रुपरेषेनुसार द्वीपक्षीय सहकार्यावरही चर्चा होईल.
लॉयड ऑस्टीन हे राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षेशीसंबंधीत असलेले अधिकारी आणि नेत्यांशीही चर्चा करतील. भारतासोबत संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यासोबतच स्वतंत्र, समृद्ध आणि खुल्या हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात चर्चा करतील. बैठकीत दोन्ही देशांचे सैन्य आणि संरक्षणसंबंधी प्रतिनिधी उपस्थित असतील. यानंतर दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात येईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times