अहमदाबाद, : पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दमदार विजय मिळवत भारताने मालिका ३-२ अशी जिंकली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी अर्धशतके झळकावत १३० धावांची भागीदारी साकारली. पण हे दोघे बाद झाले आणि इंग्लंडचा संघ विजयापासून दूर गेला.

भारताच्या २२५ धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंडला दुसऱ्याच चेंडूवर धक्का बसला. भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारने यावेळी सलामीवीर जेसन रॉयला शून्यावर बाद केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का बसला असला तरी त्यानंतर इंग्लंडच्या डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी धमाकेदार फलंदाजी केली. या दोघांनी फटकेबाजी करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये इंग्लंडला १ बाद ६२ अशी मजल मारुन दिली.

बटलरपेक्षा मलान यावेळी अधिक आक्रमकपणे फलंदाजी करत होता. मलानने यावेळी चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही मलानने भारताच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. मलानने यावेळी चौकार फटकावत आपले अर्धशतक साजरे केले. त्याचबरोबर मलानने यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वांत जलद एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही केली. मलानबरोबर बटलरनेही यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. पण बटलरला यावेळी अर्धशतकानंतर जास्त धावा करता आल्या नाही. बटलरला यावेळी भुवनेश्वर कुमारने बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. बटलरने यावेळी ३४ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारली. त्यानंतर शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोन बळी मिळवले आणइ सामना भारताच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. शार्दुलने यावेळी स्थिरस्थावर झालेल्या डेव्हिड मलानलाही बाद केले. मलानने यावेळी ४६ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारली.

तत्पूर्वी, पाचव्या आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच भारताला या महत्वाच्या सामन्यात इंग्लंडपुढे २२५ धावांचे आव्हान ठेवता आले. रोहित आणि विराट यांनी सलामीला येत इंग्लंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी धडाकेबाज फटकेबाजी करत पहिल्या सहा षटकांच्या पॉवर प्लेमध्ये बिनबाद ६० अशी धावसंख्या उभारली. रोहितने तर यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक साकारल्यावर रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने यावेळी फक्त ३४ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६४ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. रोहितला यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोक्सने बाद केले. पण त्यापूर्वी रोहित आणि कोहली यांनी ९४ धावांची सलामी दिली होती. विराट कोहलीनेही यावेळी नाबाद ८० धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here