म. टा. प्रतिनिधी,
शहरातील वाढत्या उकाड्यामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी वातानुकूलित लोकलकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार महिन्यांत मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत हळुहळू वाढ होताना दिसत असून या काळात ५२ हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवासाचा लाभ घेतला आहे.

१७ डिसेंबर २०२० ते १७ मार्च २०२१ या काळात एसी लोकलमधून एकूण १५ हजार ८६१ प्रवाशांनी प्रवास केला. यातून रेल्वेच्या तिजोरीत २१ लाख ४७ हजार ४२८ रुपयांची भर पडली. विशेष म्हणजे, यात पासधारक प्रवाशांची संख्या अधिक आहे. मार्चमधील १७ दिवसांत ९५७ तिकीट-पासची विक्री झालेली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर वातानुकूलित लोकलच्या रोज १० फेऱ्या होतात. करोनाकाळात १७ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसला, तरी आता मात्र प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मुंबईसह राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर ५० टक्क्यांचे बंधन आहे. यामुळे याचा परिणाम सर्वच प्रवासी वाहतुकीवर होणार आहे. परिणामी, येत्या काळात सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकलमधील प्रवासी संख्या घटण्याची शक्यता आहे.

गेल्या चार महिन्यांत एसी लोकलच्या प्रवासी संख्येत हळुहळू वाढ नोंदवली गेली असली, तरी लोकलमधील आसनक्षमतेचा विचार केल्यास हा प्रतिसाद कमीच आहे. मर्यादित लोकल फेऱ्या, दोन फेऱ्यांमधील अंतर यांमुळे मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलला अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेवरील एसी लोकल लोकप्रिय व्हावी, यासाठी फेऱ्या वाढवण्याची तसेच वेळेत बदल करण्याची मागणी मुंबईकर करत आहेत.

एसी लोकलची प्रवासी संख्या
महिना कार्ड तिकीटधारक पासधारक एकूण प्रवासी

डिसेंबर २०२० २३२ ३,८०० ४,०३२

जानेवारी २०२१ ६७१ १३,८७० १४,५४१

फेब्रुवारी २०२१ ८६९ १७,१३६ १८,००५

मार्च २०२१ ६९९ १५,१६२ १५,८६१

…………(१७ डिसेंबर २०२० ते १७ मार्च २०२१)

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here