मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले आहेत. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर सरकारमधील प्रत्येकानं आत्मपरिक्षण करावं, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्यांमुळं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, यासह अनेक गंभीर आरोप परमबीर यांनी या पत्रात केले. या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्राच्या राजकारण मोठा भूकंप आला आहे. या सर्व घटनेनंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारवर शिंतोडे उडाले आहेत आणि सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असं सूचक वक्तव्य केलं आहे.

परमबीर सिंह हे माजी पोलीस आयुक्त होते. ते एक उत्तम अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत उत्तम सेवा बजावली आहे. या सगळ्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य ती भूमिका घेतील. त्या पत्रात किती सत्यता आहे हे ते तपासून पाहतील. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही पत्राची सत्यता तपासून पाहण्याची मागणी केली आहे. तसंच, अशाप्रकारचे आरोप होणे हे नक्कीच दुर्देव आहे. ज्यांनी हे सरकार यावं म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या हितचिंतकांसाठी धक्कादायक आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

‘सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल,’ असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here