मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.

वाचा:

हर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तसंच, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी तीन लाखांच्या जवळपास मतं घेतली. त्यांच्या या मुसंडीमुळं शिवसेनेचे दिग्गज नेते खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचा उमेदवार निवडून आला. तेव्हापासून खैरे व जाधव यांच्यात वितुष्ट आलं आहे. दोघेही एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत.

वाचा:

जाधव यांनी आज मनसेत प्रवेश केल्यानंतर याचीच प्रचिती आली. खैरे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच जाधव यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. खैरे यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करणं थांबवावं आणि त्यांनी खासदारकीची स्वप्नं आता सोडून द्यावी. ते आता पुन्हा कधीही खासदार होणार नाही, असंही जाधव यांनी ठणकावलं.

वाचा:

मनसेत पुन्हा प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘मधल्या काळात मी थोडा विचलित झालो होतो. काही गैरसमज होते. ते दूर झाले आहेत. मनसे योग्य मार्गानं चालली आहे. मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दाही योग्य आहे. मुंबईतील मोर्चातही मी उद्या सहभागी होणार आहे.’

भाजप-मनसे युती?

दानवे यांचे जावई मनसेत गेल्यानं आता भाजप-मनसे युती होणार असल्याच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे. मात्र, जाधव यांनी ती चर्चा फेटाळली. ‘दानवेंचा जावई असलो तरी मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. खासदारकीची निवडणूकही मी स्वत:च्या ताकदीवर लढवली होती. मला २ लाख ८३ हजार मतं मिळाली. आख्ख्या महाराष्ट्रात कुठल्याही अपक्ष उमेदवाराला एवढी मतं मिळालेली नाहीत. त्यामुळं माझ्या राजकीय निर्णयांशी कौटुंबिक आयुष्याचा संबंध जोडू नका,’ असं ते म्हणाले.

प्रकाश महाजनही पुन्हा मनसेत

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी आज मनसेत प्रवेश केला. यापूर्वी ते मनसेत होते. मात्र, मधल्या काळात ते दूर गेले होते. आता पुन्हा एकदा ते स्वगृही परतले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे निष्ठावंत व कट्टर शिवसैनिक सुहास दशरथे यांनीही मनसेची वाट धरली आहे. दशरथे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here