म. टा. प्रतिनिधी, नगर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमरबीर सिंह यांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यात निर्माण झालेल्या संशयकल्लोळावर आता माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भाष्य केले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रायश्चित्त करावं अशी मागणी करताना अतिशहाणे सल्लागार असा उल्लेख करत प्रवक्ते यांच्यावर विखेंनी निशाणा साधला आहे.

या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘मनसुखलाल हिरन यांच्या मृत्यूबाबत एटीसच्या अहवालातून ब-याच गोष्टी समोर आल्‍या आहेत. त्‍यामुळे सचिन वाझेंची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहाची आणि राज्यातील जनतेची दिशाभूल केल्‍याचे उघड झाले आहे. तेव्हा आता तरी मुख्‍यमंत्री त्‍याचे प्रायश्चित्त करणार का? संपूर्ण महाराष्‍ट्राला जबाबदारीची जाणीव करुन देणा-या मुख्‍यमंत्र्यांनी आता आपल्‍या अतिशहाण्या सल्लागाराचा सल्ला ऐकून तरी आता चुप्पी सोडण्‍याची जबाबदारी पार पाडावी. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. त्यांनी पत्राव्‍दारे गृहमंत्र्यांवर केलेल्‍या थेट आरोपांबाबत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना संशय वाटत असेल तर, सेवाशर्थीचा भंग केल्याबद्दल त्यांना सरकार निलंबित का करत नाही?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.

‘मुंबईत घडलेल्‍या गंभीर घटनेतून गृहखात्‍याबाबत निर्माण झालेल्‍या प्रश्‍नांबाबत सरकार अद्यापही गांभीर्य दाखवायला तयार नाहीत. या घटनेमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगून महाविकास आघाडीचे नेते हात वर करत असतील तर, संशयाचे भूत मुख्‍यमंत्र्यांपर्यंत पोहचल्‍याशिवाय राहणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत झाली पाहिजे. यासाठी गृहमंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेण्‍याची गजर आहे. हे प्रकरण केवळ गृहमंत्र्यापुरते मर्यादित नाही. राज्‍यात महाविकास आघाडी सरकारकडून फक्‍त समान लुटीचा कार्यक्रम सुरु आहे. सरकारमध्‍ये भ्रष्‍टाचाराची मालिका सुरु आहे. एवढ्या गंभीर घटनेची वस्‍तुस्थिती मुख्‍यमंत्र्यानी समोर आणण्‍यासाठी आपल्‍या अतिशहाण्‍या सल्‍लागाराचा तरी सल्‍ला ऐकावा,’ असेही विखे पाटील म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here