दहा वर्षांपूर्वी २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचे गूढ उकलले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करून तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या तरुणीची हत्या करून निर्जन ठिकाणी तिचा मृतदेह फेकून दिला होता.
या प्रकरणी सविता लांडगे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी संशयावरून किशोर घारे याला अटक केली. एफआयआरनुसार, मृत तरुणी आणि घारे यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही हिंजवडी येथील एका कंपनीत सोबत काम करत होते. घारे याने चांदणीला लग्नाचे आश्वासन दिले होते. पण तो तिला टाळत होता. दोघांमध्ये यावरून बाचाबाचीही व्हायची. ११ सप्टेंबर २०११ रोजी घारे चांदणीच्या घरी गेला. तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. तो तिला दुचाकीवरून घेऊन गेला. पण त्यानंतर चांदणी घरी पोहोचलीच नाही.
चांदणीच्या आईने तिला वारंवार फोन केला. पण तिच्याकडील मोबाइल फोन बंद येत होता. तिने अखेर घारे याला फोन केला. त्यावेळी त्याने भलतीच माहिती दिली. तिने लग्नास नकार दिला आणि त्याच दिवशी ती निघून गेली, असे त्याने तिच्या आईला सांगितले. चांदणी पुन्हा घरी येईल या आशेने तिची आई वाट बघत होती. पण ती परत येणार नाही असे वाटताच, दोन वर्षांनी तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
चांदणीने २०११ मध्ये घर सोडले त्यावेळी तिच्या कानात ५ ग्रॅमच्या रिंग होत्या. तर पायात चांदीचे पैंजण होते. बेपत्ता झाल्याच्या तक्रारीत या बाबींचा उल्लेख करण्यात आला होता. तिच्या आईने घारे याच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही. दोन महिन्यांपूर्वी सविता यांनी घारे याला मांजरी परिसरात भाजी विक्री करताना पाहिले. त्यावेळी तिने घारेला विचारणा केली. पण त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी घारेला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चांदणीची २०११ मध्येच हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times