म. टा. प्रतिनिधी, नगर: करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लग्न समारंभ आणि अंत्ययात्रांवर कडक निर्बंध घातले आहेत. असे असले तरी एका मोठ्या नेत्याची अंत्ययात्रा नुकतीच काढण्यात आली होती. त्यानंतर या दिवंगत नेत्याच्या कुटुंबातील चार जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले असून शहरातील एकूण रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे अनेक जणांना ही अंत्ययात्रा भोवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ८५७ नव्या बाधितांची नोंद झाली. यामध्ये नगर शहरातील २९१ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात राहात्याची स्थिती वाईट असून तेथे १११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता चार हजारपर्यंत पोहोचली आहे. असे असले तरी बाकीच्या गोष्टींचा विचार करता लॉकडाऊनचा निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही, त्यापेक्षा उपाययोजना आणखी कडक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी शहरातील एका मोठ्या नेत्याचे निधन झाले होते. त्यांची शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अमरधाममध्ये नियमानुसार ठराविक लोकांनाच प्रवेश देण्यात आला असला तरी शहरातून अंत्ययात्रा जात असताना ठिकठिकाणी लोक उपस्थित राहिले होते. अमरधाबाहेर मोठ्या संख्येने लोक उपस्थित झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सांत्वनपर भेटीही सुरू आहेत. त्यामध्ये नातेवाईकांसोबतच मंत्री, नेते, आणि लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. आज त्याच दिवंगत नेत्याच्या कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

कुटुंबातील एक ज्येष्ठ महिला, दोन तरुण पुरुष आणि एका लहान मुलीचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय नातेवाईक आणि नीकटवर्तीयांपैकी काहींचे अहवालही पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. शहरातील नव्या करोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून गेल्या २४ तासांत २९१ जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अंत्ययात्रेला हजरी लावलेल्यांध्ये आणि नंतर भेटीला गेलेल्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, करोना बाधितांचे आकडे वाढत असले तरीही लगेचच लॉकडाऊनचा उपाय केला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले. तालुकानिहाय यंत्रणा सज्ज करण्यात आली असून आता अन्य कामे बाजूला ठेवून करोना नियंत्रणाच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर तातडीच्या निर्णयाचे अधिकारही देण्यात आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here