म. टा. प्रतिनिधी, नगर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमरबीर सिंह यांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, सोशल मीडियातूनही जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मात्र, यातील काही जण चिखलफेक करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. संगमनेरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा एका प्रकरणात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बदनामी केल्याची तक्रार शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली असून, पोलिसांनी दीपक भगत याच्याविरूद्ध हा दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. भगत भाजपचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात आले. सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट करून बदनामी, गैरसमज व राजकीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

तक्रारीनुसार, समाज माध्यमात राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना प्रवक्ते अॅड. अनिल परब यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करणे, त्यांचे बनावट छायाचित्रे बनवून मार्फिंग करून नियमाचे उल्लंघन करणे, त्याद्वारे बदनामीकारक संदेश पसरवणे असे प्रकार सुरू आहेत. हे सर्व प्रकार विकृत मानसिकतेच्या समाजकंटकांनी दोन राजकीय पक्षाच्या गटात तेढ निर्माण होऊन शहरात तणाव निर्माण व्हावा याच उद्देशाने केल्याचे दिसून येत आहे. त्यावरील इतरही काहींच्या कॉमेंटस’ वाचून हेच दिसून येत आहे. हा सर्व प्रकार दीपक भगत (रा. नवघरगल्ली, संगमनेर) तसेच इतर सहा व्यक्तींनी केला आहे. मात्र यात सहभागी असलेले काही जण विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान व्हावे अशी आमची इच्छा नाही. तसे शिवसेनेचे संस्कारही नाहीत. त्यामुळे त्यांना केवळ कडक शब्दांत समज देण्यात यावी आणि विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here