इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये पंचांचे बरेच निर्णय वादग्रस्त ठरले आहे. सूर्यकुमार यादवचा झेल काही दिवसांपूर्वी चांगलाच वादग्रस्त ठरला होता. त्याचबरोबर अन्य काही मैदानावरील आणि तिसऱ्या पंचांचे निर्णय सदोष असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याबद्दल विराट कोहली निराश झाला आहे. त्याचबरोबर कोहलीने यावेळी आपील नाराजी व्यक्त केली आहे.
कोहली म्हणाला की, ” पंचांचे निर्णय मनामध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. खासकरून सॉफ्ट सिग्नल या निर्णयामुळे बऱ्याचदा संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. जर मोठ्या स्पर्धांमध्ये जर पंचांकडून अशा चुका होत राहील्या तर नक्कीच त्याचा मोठा फटका संघाला बसू शकतो. त्यामुळे याचा विचार केला जायला हवा.”
कोहली पुढे म्हणाला की, ” जेव्हा एखादा फलंदाज क्लीन बोल्ड होतो तेव्हा त्याला माहिती नसते की चेंडूचा केवढा भाग नेमका स्टम्पला लागलेला आहे. त्याचबरोबर चेंडू जर स्टम्पला लागत असेल तर त्या फलंदाजाला बाद दिले गेले पाहिजे. चेंडूचा किती भाग हा स्टम्पला लागतो, या गोष्टीला जास्त महत्व द्यायला नको. जर निर्णय तुमच्या विरोधात गेला तर तुम्हाला रीव्ह्यू गमवावा लागू शकतो. त्यामुळे जर चेंडू स्टम्पला लागत असेल तर त्या फलंदाजाला बादच द्याया हवे. मी बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटमध्ये आहे. डीआरएस सुरु होण्यापूर्वी पंचांचा निर्णय अंतिम राहायचा. त्यानंतर कोणीही त्यावर आक्षेप घ्यायचे नाही. ”
सध्याच्या घडीला पायचीतचा निर्णय देताना चेंडू किती टक्के स्टम्पला लागला आहे, हे पाहिले जाते. जर चेंडू ५०पेक्षा जास्त टक्के स्टम्पला लागत असेल तर फलंदाजाला बाद दिले जाते. पण ५० टक्क्यापेक्षा कमी चेंडू जर स्टम्पला लागत असेल तर त्याला नाबाद दिले जाते. त्यामुळे या नियमांमध्ये स्पष्टता यायला हवी आणि चेंडू किती टक्के स्टम्पला लागत असेल तर फलंदाजाला बाद दिले जावे, असे कोहलीचे म्हणणे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times