म. टा. प्रतिनिधी, ठाणे
करोनाविरुद्धच्या लढ्यात आजही स्वत:च्या जीवाची बाजी लावून डॉक्टर काम करत आहेत. करोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा सन्मान होत असतानाच ठाण्यात मात्र करोनाबाधित महिलेला क्वारंटाईन सेंटरऐवजी पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात पाठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांनी महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील (कोरस हेल्थ सेंटर) ऑनड्युटी असलेल्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वर्तकनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. (on duty medical officer beaten )

ठाण्यात राहणारे डॉ. राजेशकुमार निगम १ जून २०२० पासून लोकमान्यनगर येथील कोरस हेल्थ सेंटरमध्ये कंत्राटी तत्वावर म्हणून काम करत आहेत. याठिकाणी ते कोव्हीड अँटीजन तसेच व्हॅक्सीनेशन विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या हाताखाली २५ कर्मचारी काम करतात. रविवारी सकाळी सेंटरमध्ये काम करत असताना एक ५२ वर्षाची महिला अँटीजन चाचणीसाठी आली. चाचणी केल्यानंतर या महिलेला करोनाची लागण झाल्याचे समोर आले.

डॉ. निगम यांनी या महिलेला पूर्वीच्या आजाराविषयी विचारल्यानंतर एक किडनी मुलाला दिल्याचे महिलेने सांगितले. महिलेच्या फॅमिली डॉक्टरांशी निगम यांनी चर्चा केल्यानंतर महिलेला भाईंदर पाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्याचे ठरवले. या महिलेने देखील क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची तयारी दर्शवल्याने निगम यांनी तातडीने या सेंटरमध्ये खाटा उपलब्ध आहेत का? याची चौकशी केली असता, खाट उपलब्ध होती. दहा दिवस याठिकाणी राहावे लागेल असे सांगून त्यांनी महिलेला दुपारी २ वाजता हेल्थ सेंटरमध्ये बोलावले. त्यानुसार ही महिला हेल्थ सेंटरमध्ये दुपारी आली.

दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरी-पाचपाखाडीचे विभाग अध्यक्ष महेश कदम यांचा निगम यांना फोन आला. महिलेला पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात का दाखल केले नाही अशी कदम यांनी विचारणा केल्यानंतर निगम यांनी संबंधित महिला करोना पॉझिटिव्ह असली तरी अलक्षणीक आहे. त्यामुळे नियमानुसार क्वारंटाईन करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महिलेला क्वारंटाईन सेंटरऐमध्ये न पाठवता पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात पाठवावे यासाठी कदम यांनी निगम यांना फोनवरच शिवीगाळ तसेच दमदाटी करण्यास सुरुवात केली. मात्र निगम यांनी फोन ठेवून दिला.

क्लिक करा आणि वाचा-
या प्रकारानंतर १५ मिनिटांनी कदम आणि सुरज गुप्ता हेल्थ सेंटरमध्ये आले. आणि कदम यांनी निगम यांच्या तीनवेळा कानशिलात लगावली. सुरज यानेही त्यांना मारहाण केली. यावेळी सेंटरमधील अन्य कर्मचाऱ्यांनी धाव घेत निगम यांना दोघांच्या तावडीतून सोडवले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. आणि कदम यांना ताब्यात घेतले.

निगम यांच्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य कलमाखाली कदम आणि सुरजविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ दोघाही आरोपींना अटक केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी

डॉक्टरांना मारहाण होण्याचे प्रकार वारंवार होत असून प्रत्येक वेळी दवाखान्यात तसेच रुग्णालयात सुरक्षा पुरवण्यात येईल असे आश्वासन दिले जाते. मात्र कार्यवाही काही होत नाही. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत ठाणे महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी असोसिएशनचे जनरल सेक्रटरी डॉ. संजय पिंगुळकर यांनी महापौर नरेश म्हस्के यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रानंतर महापौरांनी तातडीने पालिका आयुक्तांना पत्र लिहित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी महापालिकेच्या सर्व दवाखाने, अँटीजन चाचणी सेंटर, लसीकरण केंद्र याठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तातडीने पुरवण्याची मागणी केली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची विनंती केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here