परमबीर सिंग हे १९८८ चे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून केलेली बदली ही मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या बदलीचा आदेश रद्द करवा, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. आपली बदली रोखावी आणि देशमुख यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सीबीआयला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट
देशमुख यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना डावलून इंटेलिजन्स विभागाचे सचिन वाझे आणि समाज सेवा शाखेचे एसीपी संजय पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांची आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत त्यांना महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले गेले. यासह इतर संस्थांकडूनही खंडणीचे घेण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.
भाजप नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न करत होते
देशमुख हे वेगवेगळ्या चौकशीत हस्तक्षेप करत होते आणि पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. आपल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी अंमलबाजवणी करावी, असं सांगत होते. एवढचं नव्हे तर दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न देशमुख करत होते, असा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. गृहमंत्री आणि महाराष्ट्र सरकारकडून भाजपच्या काही नेत्यांच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी आणि त्यांना अडकवण्यासाठी दबाव आणत होते, असं परमबीर सिंग म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times