मुंबई: ‘गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे,’ असं गृहमंत्री यांनी म्हटलं आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या आरोपांनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांची पाठराखण करत सचिन वाझे आणि देशमुखांची भेट झाली नसल्याचा दावा केला होता. तसंच, राजीनाम्याची मागणीही फेटाळून लावली होती. त्यांनंतर भाजपनं देशमुखांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. या सर्व प्रकरणावर अनिल देशमुख यांनी आरोपांवर खुलासा केला आहे.

‘करोनाच्या एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूरला पाच फेब्रुवारीला मी करोनाबाधित झालो. त्यानंतर ५ ते १५ फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. १५ फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

‘होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये मी हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईतील होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर एक मार्चपासून आमचं अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती. लक्षवेधी सूचना होत्या. त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. त्यानंतर शासकीय कामासाठी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो,’ असं देशमुखांनी म्हटलं आहे.

‘जनतेत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने जनतेला चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती देत आहे,’ असं म्हणत देशमुखांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here