मुंबई, पुणे, नागपुर या तीन प्रमुख शहरांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं राजेश टोपे यांनी याआधीच काही शहरात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं म्हटलं होतं. तर, उद्या मंत्रिमंडळाची बैठक असून या बैठकीत करोना परिस्थितीबाबत काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
‘लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मला असं वाटतं की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाऊनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याचा हिताचा तसंच इतर परिणामांचा विचार करुन वरिष्ठ मंडळी चर्चा करतील व निर्णय घेतील. लॉकडाऊन हा खरं तर शेवटचा पर्याय असतो त्यामुळं याबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘पुणे, मुंबई, नागपूर या शहरांत रुग्णसंख्या वाढत असल्यानं तिथं निर्बंध कठोर करणं गरजेचं आहे. गर्दी होताच कामा नये हे पाहणं आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टनसिंग यासगळ्या गोष्टी काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत, अशी शासनाची अपेक्षा आहे आणि अशाप्रकारेच प्रादुर्भाव नियंत्रणात आणला जाऊ शकतो,’ असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
‘मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील,’ असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times