मुंबई: पाठ्यपुस्तक मंडळ सुरू झालं तेव्हा विज्ञानाचे आकर्षण नव्या पिढीला होईल, याची आम्ही काळजी घेतली. पण, अलिकडे पहिलीच्या मुलाला शिकवले जाते शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ!, असा चिमटा काढतानाच माझी आई स्कूल बोर्डात होती. सावित्रीबाई तिचा आदर्श. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी भाजपला लगावला.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या अधिवेशनाला संबोधित करताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार चिमटे काढले. यावेळी त्यांनी माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावरही टीका केली. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही लाल शाईत असते. मंत्र्यांची निळ्या शाईत असते आणि राज्यपालांची हिरव्या शाईत. आता आम्ही हिरव्या शाईचा फारसा विचार करत नाही, असा चिमटा काढतानाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हापासून मला लाल शाईची सवय आहे आणि त्यानुसार मी या यादीत टिक केली आहे, असं शरद पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी शिक्षक भारतीने मांडलेले सर्वच प्रश्न सोडवता येणार नसल्याचं प्रामाणिकपणे सांगितलं. सर्वच प्रश्न काही सोडवता येणार नाहीत. शिक्षक भारतीचे कपिल पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बसून हे मुद्दे ठरवू. आमच्यात एकवाक्यता झाल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवू. हे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील. मी पाहतोय मुख्यमंत्र्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित होते.

धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले

जसा पाच वर्ष तुम्ही संघर्ष केला. तसाच आम्हीही सत्तेत राहून संघर्ष केला. पाच वर्षात इतिहास बदलला, धडे बदलले मग आम्ही काय केले तर सरकार बदलले. धडे बदलणाऱ्यांना घरी बसवले, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पवार म्हणाले…

>> १३ हजार शाळा बंद होतात. एकीकडे सावित्रीबाई-जोतिराव फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, कर्मवीर भाऊरावांचा आदर्श द्यायचा आणि दुसरीकडे नव्या शाळा सुरू करण्याऐवजी आहेत त्या शाळा बंद करायच्या. इतका चुकीचा व पुढच्या पिढीला उद्ध्वस्त करणारा निर्णय आम्ही कधी घेतला नव्हता.

>> मागच्या राजवटीमध्ये कुठल्या मंत्र्याच्या घरी मी गेलो नाही. पण शिक्षणमंत्र्यांच्या घरी मात्र दोन-तीन वेळा गेलो. त्याचं कारण, महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रश्न व नवी पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा मला अत्यंत महत्त्वाचा वाटत होता. त्यामुळे कुठलाही कमीपणा न घेता मी शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो, अनेक बैठका घेतल्या. पण काही उपयोग झाला नाही. प्रश्न सोडवण्यासाठी काही बदल करण्याची त्याठिकाणी आवश्यकता होती. धडा हा असा आहे… हे पुनःपुन्हा सांगून जर विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्याला तो धडा शिकवावा लागतो.

>> शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे सूत्रं एकदा मान्य केल्यानतंर कुठल्याही राज्यकर्त्यांची ही जबाबदारी असते की वाड्या-वस्त्यांवरील मुला-मुलींकडे जास्त लक्ष असावं. पण, याठिकाणी २० वर्षांपासूनच्या शाळा बंद करण्यात आल्या. शाळा बंद करण्यासाठी अक्कल लागत नाही. चालू ठेवायला अक्कल लागते.

>> सरकार ही कंटिन्यूअस प्रोसेस असते. जुन्या सरकारने जे योग्य निर्णय घेतलेले असतील त्याची अंमलबजावणी करायची नाही असे नसते. प्रशासनाचं ते सूत्रं याठिकाणी पाळलं गेलं नाही. त्यामुळेच अशी मागणी याठिकाणी केली गेली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here