वरुड तालुक्यातील मिथुन श्रावण ढोणे (वय २५) याच्यावरील विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला चार वर्षे सक्तमजुरी, तसेच पाच हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
१० जानेवारी २०१५ रोजी आठवी इयत्तेत शिकणारी १३ वर्षीय मुलगी घरी होती. मिथुन ढोणे तिच्या घरात आला. त्याने मुलीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. मुलगी स्वयंपाक खोलीत पाणी आणायला गेली असता, मिथुनही तिच्या पाठिमागे गेला. मिथुनने मुलीचा हात धरून तिचे केस ओढून विनयभंग केला. या घटनेची तक्रार पीडित मुलीने वरुड पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मिथुनविरोधात विनयभंग तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. वरुड ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. पी. गावंडे यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून, ३० जुलै २०१५ ला न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण दहा साक्षीदारांच्या साक्ष तपासण्यात आल्या. आरोपी दोषी आढळून आला. न्यायालयाने आरोपीला चार वर्षे सक्तमजुरी, तसेच पाच हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच पीडितेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात सहायक सरकारी वकील अॅड. पंकज रामेश्वर इंगळे व अॅड. रणजीत भेटाळू यांनी युक्तिवाद केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times