इतर राज्यांत आता निवडणुकांची रणधुमाणी सुरु आहे. त्यामुळं महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या काँग्रेसनंही या निवडणुकीच्या अनुषंगानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील घडामोडींचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ नये यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यासंदर्भात आजच्या बैठकीत ठोस पावलं उचलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
काँग्रेस घेणार ठोस भूमिका
मनसुख हिरन हत्या, सचिन वाझेंची अटक आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यांच्यावर केलेले आरोप यामुळं ठाकरे सरकारवर चहूबाजूंनी अडचणीत सापडले आहेत. याचा परिणाम अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवरही होत असल्याची चर्चा आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी जरी या प्रकरणात सावध भूमिका घेतली आहे. मात्र, दुसऱ्या राज्यातील निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची काँग्रेस पक्षश्रेष्ठींना शंका आहे. तसंच, महाराष्ट्रात राजकीय परिस्थितीचे पडसाद पश्चिम बंगालमधील निवडणुकांवर पडणार असल्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेस या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. तसंच, बैठकीत होणाऱ्या चर्चेला अहवाल हायकमांडला पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, शरद पवार यांनी अनिल देशमुखांना या पूर्ण प्रकरणात क्लिन चिट दिली आहे. त्यामुळंही काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला असल्याची चर्चा आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times