म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मुंबई-पुण्यातील खवय्यांची आवडत्या एक्स्प्रेसमधील डायनिंग कार ‘एलएचबी’मध्ये बांधण्यास रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. नव्या धाटणीच्या डेक्कन क्वीनच्या बांधणीचे काम वेगात सुरू आहे. डिसेंबरअखेर नव्या गाडीतून प्रवाशांना मुंबई-पुणे हा प्रवास करणे शक्य होणार आहे.

देशातील पहिली डिलक्स रेल्वे अशी ओळख असलेली डेक्कन क्वीन ९१ वर्षांपासून प्रवाशांना सुखद प्रवास घडवत आहेत. आजदेखील रेल्वेगाडीची लोकप्रियता कमी झालेली नाही. या गाडीतील पदार्थांचा आस्वाद घेता यावा, या कारणास्तव प्रवास करणाऱ्या खवय्यांचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. ही लोकप्रियता लक्षात घेता रेल्वे मंडळाने डायनिंग कारचे रूपडे पालटण्यासाठी प्रस्ताव बनवण्याच्या सूचना मध्य रेल्वेला केल्या होत्या.

वाचा:

डायनिंग कारमध्ये शुद्ध शाकाहारी कटलेट, मिसळ पाव, थालीपीठ, गरमागरम कांदाभजी हे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. संकष्टी, एकादशी, चतुर्थी असा उपवास असलेल्या प्रवाशांसाठी साबुदाणा खिचडी या गाडीत उपलब्ध करून दिली जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून डायनिंग कार हटवण्याची खलबते सुरू होती. प्रवासी वाढत असल्याने डेक्कन क्वीनची ‘ओळख’ हटवून त्या ठिकाणी प्रवासी डबा जोडण्याचा घाट दिल्लीतील काही अधिकाऱ्यांचा होता. मात्र रेल्वे मंडळाने आराखडा मंजूर करून डायनिंग कार हटवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. या निर्णयाचे प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे.

४० प्रवाशांसाठी खुर्च्या-टेबल

नवी डायनिंग कार ही अपघातरोधक डब्यांमध्ये अर्थात एलएचबीमध्ये बांधण्यात येईल. या डायनिंग कारची १० टेबल आणि ४० प्रवासीक्षमता असेल. सर्व्हिस काऊंटर, सुका-ओला कचऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रसाधनगृह, दोन वॉशबेसिन अशी सुविधा यात असणार आहेत. प्रवाशांच्या ऑर्डरनुसार ताजे आणि चमचमीत पदार्थ बनवून देण्यासाठी शेगडी, फ्रीज, रेफ्रिजरेटर सर्व्हिस टेबल अशी साधनसामग्रीही यात असेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here