म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांपासून ते ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपर्यंतच्या घडामोडींमध्ये आतापर्यंत दहशतवादविरोधी पथकाने () सहा गाड्या हस्तगत केल्या आहेत. एटीएसने मंगळवारी दमण येथे छापा टाकून एक व्होल्व्हो कार हस्तगत केली. या कारचा वापर मनसुख यांच्या हत्येसाठी केल्याचा संशय एटीएसच्या अधिकाऱ्यांना आहे. यामुळे वादग्रस्त पोलिस अधिकारी यांचे दिवसागणिक ‘कार’नामे समोर येत आहेत.

हिरेन यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी क्रिकेट बुकी नरेश गोर आणि लखनभैया एन्काउंटरमधील आरोपी पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला अटक केली. या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून बरीच माहिती एटीएस अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. याच माहितीवरून एटीएसच्या पथकाने दमण येथील एका गोदामामध्ये लपवलेली व्होल्व्हो कार हस्तगत केली. ही कार ठाण्यात आणण्यात आली. त्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने तिची तपासणी केली. यामध्ये दोन बॅग, तीन जोडी कपडे, दोन चार्जर तसेच इतर काही साहित्य सापडले. वाझे याचा बिजनेस पार्टनर ही कार सध्या वापरत असून, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हिरेन यांना घरातून मुंब्रा येथील रेतीबंदरपर्यंत याच कारमधून नेल्याचा संशय आहे. कारमध्ये वाळूचे कण सापडले असल्याचे ‘एटीएस’च्या सूत्रांनी सांगितले.

शिंदेकडे ३१ बारची जबाबदारी?

विनायक शिंदे याच्याकडून ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी एक प्रिंटर आणि एक डायरी हस्तगत केली आहे. या डायरीमध्ये मुंबई ठाण्यातील ३१ बारची यादी आहे. या बारमधून पैसे जमा करण्याची जबाबदारी शिंदे याच्याकडे होती का? याबाबत एटीएसचे अधिकारी चौकशी करीत आहे. स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेली धमकीची चिठ्ठी शिंदेकडील प्रिंटरवर प्रिंट करण्यात आली होती, असेही म्हटले जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here