सुनील दिवाण

पंढरपूर: राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असून या मतदारसंघात ताकद असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . तर या मतदारसंघात जय पराजय ठरवू शकणाऱ्या धनगर समाजानेही आपला उमेदवार या निवडणुकीत उतरविल्याने आता राष्ट्रवादी समोर लोकशाही आघाडीतील बंडखोरी शमवणे डोकेदुखी ठरणार आहे.

आज उमेदवारी दाखल करायच्या दुसऱ्या दिवशी विज तोडणी आणि उसाच्या बिलावरून संतप्त असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन पाटील या आपल्या उमेदवाराचा अर्ज वाजत गाजत भरल्याने राष्ट्रवादी गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मनाला जातो. स्वाभिमानीच्याच तिकिटावर भारत भालके पहिल्यांदा विजयी झाले होते. सध्या जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाची एफआरपी दिली नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. यातच भालके यांच्या ताब्यात असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलावरून स्वाभिमानी सातत्याने आंदोलने करीत आली आहे. सध्या पिके हाताशी येऊनही सरकारने वीज बिल वसुलीसाठी सुरु केलेल्या वीज तोडणीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी संतप्त आहे तरी शहरी भागातही असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. संघटनेचा पाठीराखा असलेला शेतकरी जर अडचणीत असून शासन काही करत नसेल तर अशा सरकारला विरोध करण्यासाठी स्वाभिमानाने उमेदवारी दाखल केल्याचे उमेदवार सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

दुसऱ्या बाजूला या मतदारसंघात धनगर समाजाचे मोठे प्राबल्य असून याचसाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांची राष्ट्रवादीने निवड केली होती. वास्तविक काही दिवसापासून धनगर समाजाने राष्ट्रवादी व भाजप या दोघांकडेही उमेदवारीची मागणी केली होती. मात्र आपल्याला हे दोन्ही पक्ष उमेदवारी देत नसल्याचे लक्षात आल्यावर धनगर समाजाने ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून आज या समाजातील संजय माने या तरुणाने खांद्यावर घोंगडी व गळ्यात धनगरी ढोल बांधत वाजत गाजत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादी समोरच्या अडचणी वाढणार आहेत.

पंढरपूर व मंगळवेढ्यात धनगर समाज पालकमंत्र्यांच्यामुळे राष्ट्रवादी सोबत होता मात्र आता समाजानेच उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी समोरच्या अडचणी वाढत जाणार आहेत. धनगर समाजाकडून येत्या चार दिवसात अजून इतर उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार असून ऐनवेळी यातील एकाच अर्ज ठेवण्याचा निर्णय समाजाने घेतल्याचे अहिल्यादेवी प्रबोधिनी मंचाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. यंदा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे अजून नाव निश्चित झालेले नसताना घडणाऱ्या घडामोडी राष्ट्रवादीला अडचणी निर्माण करणाऱ्या आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here