सचिन वाझे व परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या सर्व प्रकरणांमुळं काँग्रेस नाराज असल्याचीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच राज्यातील काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी ही बैठक पार पडली होती. या बैठकीत या प्रकरणांवर चर्चा झाली होती. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी सोनिया गांधीची घेतलेली भेट महत्त्वाची ठरत आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. तुमच्याशी चर्चा करणं हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी आभारी आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. आता ही भेट नेमकी कशासाठी होती याविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत फोन टॅपिंग प्रकरणाच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन टॅपिंग प्रकरण बेकायदेशीर असल्याने या बाबतचा अहवाल आपल्याला सादर करावा, असे आदेश दिले आहेत. हा अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला, तसेच तत्कालीन मंत्रिमंडळातील काही बड्या मंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मंत्रिमंडळातील अत्यंत ज्येष्ठ मंत्र्यांने ‘मटा’ला सांगितले.
‘लेटरबॉम्ब’ची चौकशी
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times