मुंबई: परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्रात खळबळ माजली होती. परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री यांच्यावर पैसेवसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहतं या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. हाच धागा पकडत भाजपनं मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर सरकारने एक पाउल मागे येत या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमून अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्याच दरम्यान अनिल देशमुख यांनी रात्री एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. त्यासोबत एक पत्रही जोडलं आहे. याच पत्राचा आधार घेत भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी सरकारवर टीका केली आहे.

‘अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतलं गेलं ते ४ दिवस प्रलंबित ठेवून २४ तारखेला प्रसिद्ध केलं. १०० कोटी वसुलीचे आरोप व पत्रात व्हॉट्सअॅप एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव तर नाही?,’ अशी शंका चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बुधवारी रात्री एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खुद्द अनिल देशमुख यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या आयोगाचे प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती असतील व हा आयोग लवकरच नेमण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here