म. टा. प्रतिनिधी, नगर: नगर जिल्ह्यात करोनचा उद्रेक झाला असून दैनंदिन रुग्ण संख्या २४ तासांत दुप्पटीहून अधिक झाली. गुरूवारी जिल्ह्यात १, ३३८ नवे करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८७४ झाली आहे. जिल्ह्यात २८ मार्च ते २ एप्रिल या काळात होळी, धुलिवंदन, रंगपंचमी तसेच सर्व प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

उपचाराधीन रुग्णसंख्येच्या बाबतीत नगर जिल्ह्याचा राज्यात आता नववा क्रमांक आहे. नगर जिल्ह्यात मार्चच्या सुरवातीपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. आज अचानक त्याचा विस्फोट झाल्याचे आढळून आले. २४ तासांच १,३३८ नवे रुग्ण आढळून आले. काल हाच आकडा ५९९ होता. त्यामुळे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. रूग्णालय आणि कोविड केअर सेंटर हाऊस फुल्ल होऊ लागली आहेत. नगर जिल्ह्याची वाटचाल धोकादायक जिल्ह्यांच्या यादीकडे होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना कडक केल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांत बंदी घातली आहे. हॉटेल, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे २८ मार्च ते २ एप्रिल या काळात सर्व प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली आहे. होळी, धुलिवंदन, रंगपंचमी तसेच कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत, असे आदेशात म्हटले आहे. लोकांची गर्दी आणि त्यातून होणारा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आज अचानक रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. यावर्षातील ही उच्चांकी दैनंदिन रुग्ण संख्या आहे. तूर्त लॉकडाउनचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. मास्क शिवाय ग्राहक किंवा दुकानदार आढळून आल्यास संबंधित दुकान सात दिवसांसाठी सील करण्याचे अधिकारी तालुकास्तरावरील अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ठिकठिकाणी कारवाईही केली जाऊ लागली आहे. नगर शहरासह संगमनेर, राहाता आणि काेपरगाव तालुक्यात तीन अंकी संख्येत नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्ह्याचा आढावा दौरा आता पूर्ण झाला असून आज सायंकाळी नगरमध्ये जिल्ह्याची बैठक घेण्यात येऊन पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here