आप्पा उर्फ सुभाष माने (वय ३२, रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर (वय २४, रा. दड्डी, ता. फलटन, जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे – बेंगळुरू महामार्गावर शाहू टोलनाक्यावर सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुल, २० जिवंत काडतुसे, तीन मॅगजिन, मोबाइल, मोटरसायकल असा सुमारे १ लाख ६७ हजार ७४५ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आरोपी आप्पा उर्फ सुभाष माने हा दरोडा, जबरी चोरी, खंडणी अशा अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. त्याच्यावर तीन गुन्ह्यांत मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात सोन्याचे दुकान लुटताना या टोळीने पोलिसांचा पोशाख घातला होता. तेव्हा पोलिसांवर त्यांनी गोळीबारही केला. त्यानंतर फलटण येथेही पोलिसांवर या आरोपींनी गोळीबार केला होता. एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर माळशिरस येथून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला होता, असे त्यांनी सांगितले.
दुसरा आरोपी पप्पू उर्फ सुहास सोनवलकर हा देखील अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. या दोघांनी गेल्या पाच-सहा वर्षांत कोल्हापूर, सांगली, सातारा ,पुणे ,सोलापूर या जिल्ह्यांत अनेक गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. यामुळे या आरोपींना अटक करण्याचे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.
हे दोन्ही आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन पथके तयार करून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात सापळा रचला. पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. हे दोघेही नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून या भागात फिरत होते. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल, सहा राऊंड भरलेली एक मॅगजिन, वीस जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांच्या अतिशय धाडसी कामगिरीमुळे त्यांना २५ हजारांचे बक्षीस जाहीर केल्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. या कारवाईत राखीव पोलीस निरीक्षक सत्यवान माशाळकर, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक विनायक सपाटे, सहायक फौजदार कुराडे, हवालदार अमोल काळेकर यांच्यासह इतर कर्मचारी सहभागी होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times