चंद्रकांत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, कालच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, आपण पोलीस अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, आपल्याला त्यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. अहो उद्धव जी… राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता तुम्हाला खरंतर अनेक गोष्टींवर खंत वाटण्याची गरज आहे.
राज्यातील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांचं काय वैर आहे देव जाणे? शेतकरी ठाकरे सरकारच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना आपली व्यथा सरकारच्या दारी मांडून मदतीची याचना करण्याऐवजी त्यांना जीव देणं जास्त सोपे वाटतंय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?, असे सवालही पाटील यांनी उपस्थित केले आहे.
त्यांनी आपल्या ट्विटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्नावर प्रश्न विचारले आहेत. ते पुढच्याच ट्विटमध्ये म्हणतात केवळ आपला अहंकार सिद्ध करण्यासाठी तुम्ही मुंबईच्या मेट्रोचा खेळखंडोबा केला. मुंबईतील चाकरमान्यांना दिवसभर काम करून पुन्हा त्याच वाहतूक कोंडीचा नाहक त्रास तुमच्यामुळे सहन करावा लागतोय, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?
क्लिक करा आणि वाचा-
कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असणाऱ्या गोरगरीब जनतेला दिलासा देण्याऐवजी तुम्ही तुमच्या सरकारने त्यांना वाढीव वीजबिलाचा झटका दिला आणि ते भरू न शकणाऱ्या गोरगरीब जनतेचे वीज कनेक्शन खंडित केले. या मोगलाईची तुम्हाला खंत वाटत नाही का?
विदर्भ- मराठवाडा महाराष्ट्राचा भाग नसल्यासारखे तुमचे सरकार वागत आहे. या सरकारला विदर्भ-मराठवाड्याचा एवढा द्वेष का आहे? विदर्भ-मराठवाडा वैधानिक महामंडळ ते सर्वच प्रकारच्या विकासाच्या बाबतीत या सरकारने विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय केला. तुम्हाला याची खंत वाटत नाही का?, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मराठा समाजाला अथक परिश्रमाने मिळालेले आरक्षण तुम्ही आपल्या कर्मदरिद्रीपणामुळे गमावल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. अनेक मराठा तरुण-तरुणी तुमच्या या मूर्खपणाची शिक्षा भोगत आहेत, असा आरोप करतानाच तुम्हाला याची खंत वाटत नाही का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात दिवसागणिक महिला अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. तुमच्या सरकारमधील मंत्र्यांवरच महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. तुम्ही स्वतः एका मंत्र्याची या आरोपामुळे मंत्रिपदावरून गच्छन्ति केली आहे. राज्य महिला अत्याचाराचे विक्रम रचत आहे, तुम्हाला याची खंत वाटत नाही का?, असा प्रश्नही पाटील यांनी विचारला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times