नवी दिल्लीः चीनसोबतच्या करारानंतर पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या भागातून चिनी सैनिक हटले. मात्र, भारतासाठीचा धोका कमी झाला आहे, पण अजिबात संपलेला नाही, असं लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी स्पष्ट केलं. गेल्या वर्षा मेमध्ये एलएसीवर तणाव वाढल्यानंतर भारताच्या नियंत्रणात असलेल्या भागात पूर्व लडखमध्ये चिनी सैनिक अजूनही असल्याचा दावा चुकीचा आहे, असं नरवणे यांनी सांगितलं.

भारताच्या भूभागावर चीनचा ताबा नाहीः लष्कर प्रमुख

मागील क्षेत्रात सैन्याची तैनाती कायम आहे जी सीमेवर तणाव असताना होती, अशी माहिती नरवणे यांनी दिली. तसंच चिनी सैनिकांनी भारतीय सीमेवत घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? असा प्रश्न नरवणे यांना केला गेला. त्यावर त्यांनी हो, असं उत्तर दिलं. टाइम्स नेटवर्कच्या ‘इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.

‘LAC वर आपण आपल्या सर्व उद्देशांवर यशस्वी होऊ’

सीमा भागात अद्याप गस्त सुरू झालेली नाही. कारण अजूनही सीमेवर मोठा तणाव आहे आणि संघर्षाची स्थिती कायम आहे. एकूण सीमेवरील संपूर्ण स्थिती पाहता आपला पाया मजबूत आहे आणि आपण आपल्या सर्व उद्देशांत यशस्वी होऊ, असा विश्वास नरवणे यांनी व्यक्त केला.

‘भारताचा ताबा होता त्या भागांवर चीनचा कब्जा नाही’

एप्रिल २०२० मध्ये चिनी सैनिकांनी भारताच्या नियंत्रणात असलेल्या भूभागात घुसले होते. तिथे अजूनही चिनी सैनिक ठाण मांडून आहेत का? असा प्रश्न नरवणे यांना केला गेला. असे काही भाग आहेत जे कोणाच्याही नियंत्रणात नाहीत. यामुळे जेव्हा आपण त्यावर नियंत्रण करतो ते आपल्या ताब्यात असतात. आणि जेव्हा चीनकडून नियंत्रण मिळवलं जातं तेव्हा तो भाग चीनच्या ताब्यात असतो, असं लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांनी स्पष्ट केलं.

प्रत्यक्ष ताबा रेषा निश्चित नसल्याने वादाचा मुद्दा हा ‘ग्रे’ झोनमुळे आहे. यामुळे दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. जोपर्यंत सैनिक मागच्या क्षेत्रातून मागे हटत नाही तोपर्यंत एलएसीवरील स्थिती सामान्य झाली असं म्हणता येणार नाही, असं लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here