मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या दरांत गेल्या दोन दिवसांत काही पैशांची कपात करण्यात आली आहे. त्यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘इंधन दरातील ही कपात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यामुळं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ढिंढोरे पिटू नये. त्याऐवजी वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या प्रचंड दरवाढीतून केंद्र सरकारला जी ‘वरकमाई’ झाली आहे, त्यातील काही हिस्सा करोना आणि लॉकडाऊनमुळे पिचलेल्या जनतेला द्यावा,’ अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

वाचा:

गेल्या वर्षभरापासून वाढत असलेले पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी आणि गुरुवारी प्रथमच काही पैशांनी खाली आले. त्यामुळं पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैशांनी स्वस्त झालं आहे. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या दरकपातीवर भाष्य केलंय. ‘मुळात इंधन दरवाढीबाबत केंद्रातील सरकारचे धोरण गेले वर्षभर ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असंच राहिलं आहे. वर्षभरापासून इंधनाचे आणि घरगुती गॅसचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सर्वसामान्यांनी आवाज उठवूनही केंद्र सरकारनं त्याकडं दुर्लक्ष केलं होतं. आता कच्च्या तेलाचे दर घसरल्यामुळं दरकपात करण्यात आलीय. म्हणजेच उद्या जागतिक बाजारात पुन्हा दरवाढ झाली तर आज मिळालेला दिलासा तात्पुरता ठरू शकतो,’ अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केलीय.

वाचा:

‘आसाम, पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत इंधन महागाईच्या ‘फोडणी’चा ठसका लागू नये यासाठीही केंद्र सरकारची ही दरकपातीची मखलाशी असू शकते. म्हणजे ‘कारण’ जागतिक बाजारातील दर घसरणीचे आणि ‘निमित्त’ आहे देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे, असा हा सगळा हिशेब आहे. पण सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते हे कोणी विसरू नये,’ असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

वाचा:

‘१ जानेवारी २०२० ते मार्च २०२० या काळात केंद्र सरकारला प्रतिलिटर पेट्रोलमागे २० रुपये आणि डिझेलमागे १६ रुपये महसूल मिळत होता. आता हेच आकडे ३३ आणि ३२ रुपये असे झाले आहेत. म्हणजे सरकारची प्रतिलिटर कमाई १३ आणि १६ रुपयांनी वाढली आहे, पण जनतेच्या खिशाचे काय? प्रत्येक लिटरमागे त्याचा खिसा १३ आणि १६ रुपयांनी रिकामा होत आहे याचा विचार कोणी करायचा? शिवाय आता केलेली ३९ आणि ३७ पैशांची स्वस्ताई किती काळ टिकणार आहे,’ असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here