फडणवीस प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस रश्मी शुक्ला आणि भाजपवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याचेही ते म्हणाले. या अहवालाच असे म्हटले आहे की, जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न असेल तेव्हाच फोन टॅप करता येतात. परंतु, एखादा गुन्हा होणार आहे असा संशय किंवा शक्यता असेल तेव्हा फोन टॅपिंगची परवानगी मागता येते. नेमकी हेच अहवालात आलेले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक खाते (ACB) देखील अशा प्रकारे फोन टॅप करते. हे पाहता फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारच्या या अहवालात दोष आहेत असे म्हणता येते, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा नवाब मलिकावर ‘हा’ आरोप
राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या अहवालाचे केवळ कव्हरिंग लेटर मी वाचले होते. हा मी फोडला नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. असे असतानाही आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे असे सांगत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
मी कव्हरिंग लेटर वाचले आणि उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांकडे पाठवला होता. मात्र, नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने मीडियाला दिली. याचाच अर्थ हा अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असा थेट आरोप फडणवीस यांनी केला आहे.
या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. या प्रकणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी अशी सूचना तत्कालीन पोलीस महासंचालकांनी केली होती. मग या प्रकरणी चौकशी का झाली नाही?, कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असे प्रश्न फडणवीसांनी विचारले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times