म. टा. प्रतिनिधी, नागपूरः सध्या संपूर्ण देशभर बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविणाऱ्यांवर छापामार कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर झोनल युनिटने नाशिक, पालघर आणि ठाणे विभागातील पंधरा बनावट कंपन्यांचा पर्दाफाश केला आहे. या कंपन्यांनी तीन हजार कोटींचे खोटे आर्थिक व्यवहार दाखवून २८२.३४ रुपयांचा आयटीसी मिळविला आहे.

खोटे व्यवहार करणाऱ्या पंधरा कंपन्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना पुरवठा केल्याचे दर्शवित आयटीसी मिळविला. या कंपन्या सेंद्रीय खते, रसायने, रंग, बोर्ड-पॅनेल, प्रयोगशाळेत वापरली जाणारे रसायने, सल्फ्युरिक अॅसिडचे उत्पादन करणाऱ्या आहेत. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा पुरवठा या कंपन्यांद्वारे करण्यात आला नाही. याच महिन्यात बारा तारखेला नवी दिल्ली, दिल्ली-एनसीआर आणि फरिदाबाद येथील बारा कंपन्यांचा पर्दाफाश करण्यात आला होता. महिन्याभरातील ही दुसरी मोठी कारवाई असून गैरप्रकार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. परिणामत: जीएसटी कायद्याच्या सरलीकरणाची मागणीदेखील जोरकसपणे होऊ लागल्याची चर्चा आहे. सध्या नागपूर झोनल युनिट अंतर्गत येणाऱ्या विविध पथकांद्वारे मोठ्या प्रमाणात सर्च कारवाई सुरू असल्याची माहिती आहे.

६ जणांना न्यायालयीन कोठडी

विभागाद्वारे झालेल्या कारवाईमध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली असता आर्थिक गैरव्यवहाराची कबुली दिली. सहाही आरोपी दडून बसले होते. परंतु, त्यांना शोधण्यात विभागाला यश आले. सर्व आरोपींना विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाचे गांर्भीय लक्षात घेत चौदा दिवसांची न्यायालयील कोठडी सुनावली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here