मुंबई: नागरिकत्व सुधारण कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले जात आहेत त्या मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा गर्भीत इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला.

देशातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत महामोर्चा काढला. या मोर्चाला अलोट गर्दी उसळली होती. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व खुद्द राज ठाकरे यांनी केले. हा मोर्चा आझाद मैदानात पोहचताच जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना राज यांनी सीएए आणि एनआरसीचे जोरदार समर्थन केले.

‘सीएए’ गैर काय असा प्रश्न विचारत राज यांनी देशात सध्या सीएए आणि एनआरसीविरोधात जे मोर्चे काढले जात आहेत त्यांचा समाचार घेतला. तुम्हाला या देशात जे स्वातंत्र्य मिळालं आहे तितकं स्वातंत्र्य जगातील कुठल्याही देशात दिलं जात नाही. त्यामुळे सुखाने राहा. उगाच सगळं बरबाद करायचा विचार करू नका, असा खरमरीत सल्ला राज यांनी संबंधितांना दिला. जे प्रामाणिक मुसलमान आहेत त्यांनीही जगजागृती करायला हवी, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.

सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं आहे. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर भाजप समर्थक म्हटलं जातंय. पण त्यापलीकडे ठोस भूमिकाही असते आणि तीच मनसेने घेतली आहे, असे राज म्हणाले. देशात आज जी आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे, त्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून सीएए सारखे कायदे आणले जात असतील तर ते चुकीचे आहे. असे कायदे आणताना त्याची कठोरपणे अंमलबजावणीही करा, हेच माझे केंद्राला सांगणे असल्याचे राज यांनी निक्षून सांगितले. घुसखोरांना बाहेर काढून हा देश साफ करावाच लागेल. अशी बिळं बुजवावीच लागतील. त्याबाबत इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे, असे राज म्हणाले. कोणतेही कायदे समजून न घेता आपली ताकद दाखविण्यासाठी देशात जे मोर्चे काढले जात आहेत त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत, असं नमूद करत मोर्चाला प्रचंड प्रतिसाद देणाऱ्या कार्यकर्त्यांचे राज यांनी आभार मानले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here