नांदेडच्या एमआयडीसी परिक्षेत्रामधील ‘डिजॉन’ कॅज्युअल्सचे मालक, व्यवस्थापक, कर्मचारी तसेच नोकर नेहमीप्रमाणेच १६ मार्च रोजी सायंकाळी उशिरा रेडिमेड कपड्यांचे गोदाम व रेडिमेड कपड्याचे दुकान बंद करून घरी गेले. १७ मार्च रोजी पहाटे सव्वातीन ते सव्वाचार वाजेदरम्यान चेहऱ्यावर कापड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील शटर वाकवून आत प्रवेश केला. त्याचवेळी, अज्ञात चोरट्यांनी गोदामात तब्बल एक तासभर थांबून गोदामातील सुट, शेरवानी, ब्लेजर, हेवी जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस, दोन संगणक आणि काउंटरमधील रोख ५०० रुपयांसह सुमारे २१ ते २२ लाख रूपये किंमतीचे रेडिमेड ड्रेस चोरून नेले, अशी माहिती ‘डीजॉन’ कॅज्युअल्सचे मालक दीपक प्रेमचंदानी व व्यवस्थापक खान इरफान अली यांनी दिली.
या घटनेची माहिती समजताच डीवायएसपी डॉ. सिध्देश्वर भोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शेख असद, गणेश होळकर व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी गेले. पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनानुसार, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी १८ मार्च रोजी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times