करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने अंशत: लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याने जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाउन जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. या लॉकडाउनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा काही वेळ सुरू असतील. किराणा मालाची विक्री सकाळी ८ ते दुपारी १२, दूध विक्री-वितरण व भाजीपाला विक्री सकाळी ६ ते ११, मटण, चिकण विक्री सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सुपर मार्केट्समध्ये फक्त किराणा व भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तिस गणवेश व ओळखपत्र आवश्यक आहे.
लॉकडाउनमधून उद्योग क्षेत्राला वगळण्यात आले आहे. सर्व प्रकारचे उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार काम करणार आहेत. औद्योगिक वस्तूंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानुसार सुरू आहे. वर्तमानपत्रे, नियतकालिकांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजिटल व प्रिंट मिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी ६ ते ११ या वेळेत करता येणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय वापरावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
लॉकडाउनमध्ये परवानगी असलेल्या आस्थापना, कारखाने, दुकानातील मालक, अधिकारी, कामगार, मजूर यांची दर पंधरा दिवसांनी आरटीपीसीआर किंवा रॅपिड अँटीजेन चाचणी करणे बंधनकारक आहे. खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा नियमित सुरू असतील. लॉकडाउनचे कारण सांगून रुग्णालयाने रुग्णांना आवश्यक सेवा नाकारल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ई-कॉमर्स सेवा नियमित सुरू असतील. अंत्यविधीसाठी फक्त २० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी आहे. बाहेरगावी जाताना सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्यक आहे. या प्रवाशांनी ७२ तासांच्या आत चाचणी केली असणे आवश्यक आहे. सर्व बँका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरू राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवा सुरू
पेट्रोल पंप, गॅस पंप, अत्यावश्यक सेवेची वाहने, पोलिस, आरोग्य, महसूल विभाग, इतर शासकीय विभागांची वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांची वाहने, जीवनावश्यक सेवा नागरिकांना घरपोच पुरविणाऱ्या खासगी आस्थापनांचे गॅस वितरक, पिण्याचे पाणी पुरविणारे यांच्या वाहनांना इंधन पुरवठा केला जाणार आहे. स्वस्त धान्य दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. वाहन दुरुस्ती, कृषी साहित्याची दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू असतील.
या सुविधा बंद असणार
पाचपेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक जागेत एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. क्रीडांगणे, उद्याने, उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, शॉपिंग मॉल, बाजार बंद आहे. हॉटेलमधील आसनव्यवस्थेसह जेवणाची सुविधा बंद आहे. सलून, ब्युटी पार्लर, शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद आहे. तथापि ऑनलाइन वर्ग सुरू राहतील. स्थानिक, सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहनांना परवानगी नाही.
अत्यावश्यक सेवेतील आणि पूर्व परवानगी प्राप्त वाहनांना परवानगी आहे. ऑटोमध्ये दोन प्रवाशांना मास्कसह प्रवास करता येईल. सर्व प्रकारचे बांधकाम बंद राहतील. चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाट्यगृह, प्रेक्षागृह, मद्याची दुकाने बंद असतील. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times