म. टा. प्रतिनिधी, नागपूरः दिवंगत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना मी कायम सहकार्य आणि मदत केली आहे. त्यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्याबद्दल असलेला आदर प्रकर्षाने दिसून येतो. माझी पूर्ण चौकशी न करता केलेली बदली ही नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात आहे, असा दावा दीपाली चव्हाण मृत्युप्रकरणात बदली करण्यात आले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी केला आहे.

रेड्डी यांना नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी शनिवारी राज्याच्या वनबलप्रमुखांना आपली बाजू मांडणारे निवेदन सादर केले आहे. दीपाली यांनी रजा नाकारणे आणि वेतन थांबविणे याबाबत आरोप केला आहे. रजा मंजुरीचे अधिकार उपवनसंरक्षकांचे असतात, असे रेड्डी यांनी म्हटलं आहे. उपवनसंरक्षकांचे कार्यालयाचे स्तरावरून त्यांना मंजूर करण्यात आलेली रजा तसेच नामंजूर करण्यात आलेल्या रजेचा तपशील आपल्या निवेदनात त्यांनी मांडला आहे. त्यांचे वेतन किंवा भत्ते थांबविण्याचे निर्देशही दिले नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

चव्हाण यांची बदली मेळघाटबाहेर व्हावी यासाठी त्यांना सहकार्य केले होते. दीपाली यांनी अश्लील शिविगाळीबाबत लेखी तक्रार केली नव्हती. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून विनोद शिवकुमार यांना तोंडी समज देण्यात आली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी क्वचित प्रसंगीच संबंध येत होता. अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात त्यांना कायदेशीर साहाय्य मिळावे म्हणून प्रयत्नदेखील केले होते. चव्हाण यांना मी कायम प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकारी म्हणून मी वेळोवेळी सहकार्य केले. असे असतानाही कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी माझी बदली करणे हे नैसर्गिक न्यायतत्वाला धरुन नाही. त्यामुळे, पुनर्विचार करून माझी बदली रद्द करावी, असेही रेड्डी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here