म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्य सरकारने रविवारपासून लागू केलेल्या रात्रीच्या संचारबंदी आणि मुंबई पालिकेच्या निर्णयानंतर मुंबईत होळी पेटविता येईल की नाही, हा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, होळी पेटविण्यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना होळी पेटविता येईल. त्यावेळेस जमावबंदी आणि करोना प्रादूर्भाव लक्षात घेऊन मर्यादित स्वरुपात होळीचा आनंद लुटता येऊ शकतो. पण, सोमवारी सार्वजनिकरित्या धुळवड करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईत रात्री जमावबंदीचे लागू करण्याच्या निर्णयाने होळी पेटविण्याविषयी मुंबईकरांमध्ये संभ्रम अधिकच वाढला. त्यात पालिकेच्या यापूर्वीच्या होळी, धुळवडसंदर्भातील निर्णयाची भर पडली. त्यामुळे, होळी साजरी करायची की नाही याविषयी मुंबईतील शेकडो गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. यापार्श्वभूमीवर होळी पेटविता येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
जमावबंदीचे नियम लक्षात घेऊन होळी साजरी करावी, ठिकाणी पाच पेक्षा अधिक व्यक्ती नसाव्यात, अशाप्रकारे काळजी घ्यावी, असे अतिरिक पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. त्यामुळे आज, रविवारी होळी साजरी करताना मर्यादीत स्वरुपात होळी साजरा करता येणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times