मुंबई: मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी पक्षाचा झेंडा बदलावा लागला नाही. एक नेता आणि एक झेंडा हीच आजही शिवसेनेची ओळख आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी अप्रत्यक्षपणे मनसेवर निशाणा साधला. सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मनसेच्या महामोर्चानंतर झालेल्या या बैठकीत थेट मनसेचा उल्लेख झाला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वावर जाणीवपूर्वक भाष्य केले.

‘शिवसेनेला हिंदुत्व नव्याने सिद्ध करण्याची गरज नाही. शिवसेना ज्या हिंदुत्वाचा पुरस्कार करत आली आहे ते हिंदुत्व बाळासाहेबांचे असून ते शुद्ध आणि पवित्र आहे. त्यात जराही खोट नाही’, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. एक नेता आणि एक झेंडा हे सूत्र घेऊन शिवसेना वाटचाल करत आली आहे आणि हे सगळ्या जगाला माहीत आहे. त्यामुळे आमचं हिंदुत्व काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नसून शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्व सोडणार नाही, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केली म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाचा त्याग केला, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही उद्धव यांनी नमूद केले. शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे आणि राहील. मात्र सध्या आमच्यासाठी महाराष्ट्राचं हित आणि विकास महत्त्वाचा आहे, असेही उद्धव यांनी सांगितले.

हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध मनसेने आज मुंबईत पहिला महामोर्चा काढला. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here