अहमदनगर: सध्या वाळू माफियांनी सर्वत्र उच्छाद मांडला आहे. यातूनच गावपातळीवर गुन्‍हेगारी आणि गावपुढाऱ्यांची दादागिरीही वाढली आहे. या वाळू माफियांवर मंत्री काहीच बोलायला तयार नाहीत. सरकारही या विषयावर मूग गिळून गप्प असून वाळू माफियांना पोसण्याचेच काम सुरू आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेले त्यांचे पुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनीही हा मुद्दा उचलून धरत महसूल विभागाने आणलेल्या माती मिश्रीत वाळूच्‍या फंड्याचा लवकरच भांडाफोड करणार असल्याचा इशारा दिला. (Vikhe Father Son Targets Balasaheb Thorat)

नगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यावेळी विखे पिता-पुत्र एकत्र आले होते. यावेळी त्यांनी महसूल मंत्री आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. माजी मंत्री विखे यांनी निळवंडे कालवे आणि वाळूच्या मुद्द्यावरून तर सुजय विखे यांनी महसूल खात्यातील बदल्या आणि वाळूच्या विषयांवर टीका केली. निळवंडेच्या प्रश्नाचा पाठपुरावा केल्याबद्दल भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.

राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘राज्यात सध्या माफिया राज सुरू आहे. जिल्ह्यात आणि राज्यातही वाळू व्यावसायिकांनी उच्छाद मांडला आहे. असे असूनही सरकार ठोस पावले उचलण्यास तयार नाही. उलट सरकारच या वाळू व्यावसायातील बगलबच्चांना पाठीशी घालत आहे. बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्र उद्ध्वस्त झाली आहेत. नेत्यांनी वाळू माफियांना पोसायचे आणि त्या माफियांनी गावपुढारी आणि गुन्हेगार पोसायचे अशी पद्धती सुरू आहे. त्यातून वाढलेल्या गुन्हेगारीचा जनतेला त्रास होत आहे,’ असेही विखे म्हणाले.

पाणी प्रश्नावर ते म्हणाले, ‘समन्यायी पाणी वाटपाच्या संदर्भात आपण न्यायालयीन लढाई लढतो आहोत. समन्यायीमुळे गोदावरी, प्रवरा, मुळा खोर्‍यातील पाणी कमी झाले. त्याचे शेती व्यावसायावर विपरीत परिणाम झाले. पश्‍चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविले पाहिजे. त्यामुळे तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाणी निर्माण होईल. यासाठी आपण मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या कार्यकाळात शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत ५० कोटी मंजुर करुन घेतले. पण दुदैवाने आघाडी सरकार आले आणि ते काम ठप्प झाले. कृष्णा खोर्‍यातील पाणी आणण्यासाठी मोठा निधी मंजूर केला जातो तर मग तुटीचे खोरे असलेल्या गोदावरी खोर्‍यासाठी का नाही?’ असा प्रश्‍नही विखे पाटील यांनी उपस्थित केला.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘राज्यात गृह विभागाचे शंभर कोटीच्या वसुलीचे भांडे फुटले. आता महसूल विभागाचेही बदल्यांमध्ये भांडे फुटणार आहे. महसूल खात्‍याने आणलेल्या माती मिश्रीत वाळूच्‍या फंड्याचाही आपण लवकरच पर्दाफाश करणार आहोत. राज्यात सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खासगीकरण करण्याचा डाव सुरू आहे. मात्र, जोपर्यंत विखे पाटील घराणे राजकारणात आहे, तोपर्यंत नगर जिल्ह्यात हे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. दिवंगत पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा संघर्ष केला. आम्ही पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामुळेच मोठे आहोत. मंत्रिपदापेक्षा कार्यकर्ते आम्हाला महत्त्वाचे आहेत. या परिसरात काही आंदोलनजीवी, बुद्धीजीवी लोक आहेत. अनेकांना आम्हाला शिव्या दिल्याशिवाय झोप येत नाही. न्यायालयात जातात. त्यांना कोण मदत करते हे सर्वांना माहिती आहे. त्याचा आम्हाला फरक पडत नाही,’ असेही डॉ. विखे म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here