राज्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा राज्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नियम पाळले नाही तर लॉकडाऊनची तयारी करा असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, भाजपनं पुन्हा लॉकडाऊनला विरोध केला आहे. तसंच, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सल्लाही दिला आहे.
‘लॉकडाऊनमध्ये एक वर्षभर लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यामुळं पूर्वी जसे राजे महाराजे वेषांतर करुन वस्तींमध्ये फिरायचे तसं फिरलं पाहिजे. कारण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरलं तर तुमच्यासोबत ताफा असेल त्यामुळं कोणी तुमच्याशी मनमोकळे पणांनं बोलणार नाही. तर तुम्ही प्रामुख्यानं झोपडपट्टीमध्ये फिरावं,’ असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
‘नाईट कर्फ्यू चालेल. ज्यांना नाईट लाईफ हवी आहे, ते तुमच्यासोबत आहेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचं. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘तुम्ही चाचण्या वाढवल्या पाहिजेत. ज्याला काहीही लक्षण नाहीत त्यांचेही टेस्टिंग करा. रुग्ण लवकर कळतील. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही तसंच, उपचारांची केंद्र वाढवा,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times