म. टा. प्रतिनिधी, नगर: ‘पोलिस दलातील फौजदारपदावर कार्यरत एखाद्या अधिकाऱ्याचे कारनामे उघड झाले म्हणजे लगेच सरकार अडचणीत आले असे नसते. सचिन वाझे यांना महागड्या गाड्या घ्या, ऐशोआराम करा, असे सरकारने थोडेच सांगितले? एखाद्या डॅशिंग अधिकाऱ्याला शबासकी देणे म्हणजे त्याला गैरकृत्य करण्यास सवलत देणे असे नाही,’ असे सांगत ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री यांनी वाझे प्रकरणातील सत्य लवकरात लवकर पुढे यावे, अशी आमचीही इच्छा असल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुश्रीफ नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. वाझे प्रकरणासंबंधी बोलताना ते म्हणाले, ‘पोलिस अधिकाऱ्यांना वर्दीचा अभिमान असावा, वर्दीचा उपयोग समाजासाठी करता आला पाहिजे. त्या आडून गैरकृत्य करता कामा नये. मात्र, याचाच त्यांना विसर पडल्याचे दिसते. आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला आहे तर आमचीही इच्छा आहे या की याचा लवकरात लवकर तपास लागावा. ती स्फोटके कोणी ठेवली, कशासाठी ठेवली, याचा मास्टरमाइंड कोण हे सत्य बाहेर आले पाहिजे.’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांना भाजप माफीचा साक्षिदार बनवून पहात आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी आज पुन्हा केला. ते म्हणाले, ‘अन्वय नाइक आत्महत्याप्रकरण आणि दूरचित्रवाणी माध्यमांचा टीआरपी घोटाळा प्रकरण याचा तपास परमवीर सिंग यांनी उत्साहाने केला. त्यामध्ये अर्णव गोस्वामी आडचणीत आले. तेव्हा परमवीर सिंग भाजपच्या रडावर होते. त्यानंतर वाझे प्रकरण घडले. त्याचे धागेदोरे थेट परमवीर सिंग यांच्यापर्यंत असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. तेथे त्यांनी भेटीगाठी घेतल्या आणि नंतर परमवीर सिंगांचे ते पत्र समोर आले. हा घटनाक्रम पाहिला तर भाजप त्यांना माफीचा साक्षिदार करून यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग आणि अपक्ष आमदारांना भाजपमध्ये येण्यास सांगणे हे प्रकारही गंभीर आहेत. त्यामुळे या सर्वांचा लवकरात लवकर छडा लागावा असे आपल्याला वाटते.’

महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, ‘आमची आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी धोका नाही. अर्थात सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे. शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत असेही नाही. तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे, तोर्पंत आघाडी कायम राहील. मात्र, यात मतभेद निर्माण होतील असे कोणी वागू आणि बोलू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्जवळ व्यक्तीमत्व आहे. त्यांनीच कबूल केले की, अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो. आम्ही अनुभवी मंत्री त्यांना सल्ला देऊच पण ऐकायचा की नाही, कशाच्या अधारे आपले मत बनवायचे, हा त्यांचा अधिकार असेल. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या अफवा आहेत. भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया देऊन संभ्रम निर्माण करीत आहेत,’ असेही मुश्रीफ म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here