राज्याच्या अनेक भागात तापमानाचा कमाल पारा ४० अंश नोंदवला गेला आहे. मात्र आता हळुहळू उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथीलही तापमान वाढलेले दिसून येत आहे. कोकणातील तापमानवाढीचा फारसा त्रास जाणवत नसला तरी यंदा तिथंही पारा चढला आहे. शुक्रवारी रत्नागिरीत नोंदवलेले तापमान हे गेल्या २५ वर्षांमधील सर्वात उष्ण असे तिसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. या आधी २०११ आणि २००४ मध्ये तापमानाचा पारा अनुक्रमे ४०.६ आणि ४०.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. तर, उद्या व परवाही उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवणार आहेत.
३० मार्च व ३१ मार्च रोजी पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला असून तापमान ४२ अंशच्या वर जाण्याची शक्यता आहे.
एप्रिलमध्ये ‘कमाल’ जास्त
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह किनारपट्टीवर कमाल तापमान हे सरासरीएवढे किंवा त्याहून किंचित जास्त असेल असा अंदाज आहे.
यंदा अधिक तापदायक?
यंदाचा उन्हाळा हा गेल्या वर्षापेक्षा अधिक तापदायक होईल, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे मुंबईकर गरजेपुरतेच उन्हाळ्यात बाहेर पडले. मात्र यंदा कार्यालये सुरू झाली आहेत. त्यातच करोनाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे हा उन्हाळा अधिक तापदायक वाटेल, असाही अंदाज आहे.
या वाढत्या उन्हामुळे होत असलेली लाही, मास्क व सध्या करोनाच्या भीतीने बाहेरचे पाणी पिण्यासाठी वाटणारी चिंता, इतर वेळी उन्हाळ्यामध्ये सर्रास रस्त्यावरील ठेल्यांवर प्यायला जाणारा ज्युस, ऊसाचा रस यावर सध्या निर्बंध आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times