( सुनील दिवाण )

पंढरपूर: दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून तर भाजप कडून समाधान अवताडे या दोन तरुण नेत्यात लढत होणार असून उद्या दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असताना आज भाजप व राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली.

कोण आहेत भगीरथ भालके?

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके हे कला शाखेतील पदवीधर असून केवळ ३४ व्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भगीरथ हे गेली १० वर्षे वडिलांना राजकीय कामकाजात मोठी मदत करीत असल्याने त्यांना निवडणुकांचा चांगला अनुभव आहे. गेले १० वर्षे ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक असून वडिलांच्या निधनानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भगीरथ भालके यांनी गेल्या वेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या कासेगाव गटातून निवडणूक लढवली होती मात्र त्यांना येथे पराभव पत्करावा लागला होता.

समाधान आवतडेंचे तगडे आव्हान

त्या तुलनेने भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे थोडे जास्त अनुभवी असून त्यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. अवताडे हे ४५ वर्षाचे असून सिव्हिल इंजिनियर आहेत. तसे अवताडे याना कोणती राजकीय पार्श्वभूमी नसली तरी तरुणांच्यात ते खूप लोकप्रिय आहेत. अवताडे हे मोठे बांधकाम व्यावसायिक असून शेकडो किलोमीटरचे रोड बांधायची कामे त्यांच्या कंपनीकडे आहेत. गेल्या दोन निवडणुकात सलग पराभव होत असतानाही अवताडे यांच्या मतांमध्ये चांगली वाढ झालेली आहे. अशातच ८० हजारांचा मताचा गठ्ठा असणारे परिचारक यांच्यावर अवताडे याना निवडून आणायची जबाबदारी पक्षाने सोपविल्याने अवताडे याना तशी निवडणूक सोपी बनली आहे.

पंढरपूर मतदारसंघात गेल्या दोन निवडणूक परिचारक आणि अवताडे यांच्या मतविभाजनातून भारत भालके निवडून येत होते. भालके याना गेल्या निवडणुकीत ८९ हजार मते मिळाली होती तर परिचारक याना ७६ हजार तर अवताडे याना ५४ हजार मते मिळाली होती. भाजपने अवताडे व परिचारक यांच्यातून एक उमेदवार दिल्याने हि दोन्ही मते राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा खूप जास्त आहेत. अशातच वीज तोडणी व इतर मुद्द्यावर मतदारात असलेली नाराजी अवताडे यांच्या बाजूने झुकू शकणारी आहे. मात्र भारत भालके यांचे झालेले नुकतेच अकाली निधन आणि यातून मिळणारी सहानुभूती याचा फायदा भगीरथ भालके याना मिळणार आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवसेनेच्या शैला गोडसे यांच्या बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी राष्ट्रवादीला आधी या बंडखोरांना थांबवावे लागणार आहे. उद्या राष्ट्रवादीचा अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील तर भाजपचा अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील येणार असून उद्या अजून किती बंडखोर अर्ज टाकणार याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here