राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री यांनी आज लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच अन्य पर्यायांचा विचार व्हायला हवा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, असे मलिक यांनी पुढे नमूद केले. लॉकडाऊनसाठी नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केली म्हणजे लॉकडाऊन आता अपरिहार्य आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. जर लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकते, असेही मलिक यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आज लॉकडाऊनला आमचा विरोध असल्याचे सांगितले होते. अन्य पर्यायांचा विचार सरकारने करावा, असेही भाजपचे म्हणणे आहे. दुसरीकडे व्यापारी वर्गातूनही लॉकडाऊनला आतापासूनच विरोध केला जाऊ लागला असून हा विषय नव्या वादाला तोंड फोडणार असे दिसत आहे.
वाचा:
मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले?
राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णवाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे रविवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत यावर गंभीर चर्चा करण्यात आली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्समधील डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा असे मत नोंदवले गेले. त्यानंतर लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत व त्यासाठी नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होताना दिसत नाही, विवाह समारंभ नियम मोडून सुरू आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times