पणजी: भारतात कुणाला काम करायचे असल्यास त्याला हिदूंच्या सशक्तीकरणासाठी काम करावं लागेल, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी केले आहे. दोनापावला येथे आरएसएसने आयोजित केलेल्या एका परिषदेत मार्गदर्शन करताना जोशी यांनी हिंदूच्या सशक्तीकरणाची गरज अधोरेखित करत नव्याने संदेश देण्याचा प्रयत्न केला.

‘विश्वगुरु भारत-आरएसएसचा दृष्टीकोन’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेत बोलताना जोशी यांनी हिंदुत्वावर जोर दिला. भारतात कुणाला ‘आयडिया ऑफ इंडिया’साठी काम करायचं असेल तर दुसऱ्या अर्थाने त्याला हिंदूंच्या सशक्तीकरणासाठीच काम करावं लागेल, असे जोशी म्हणाले.

भारताला हिंदूंपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. भारत आज केवळ आणि केवळ हिंदूमुळेच जिवंत आहे. भारतात हिंदू केंद्रस्थानी असून ज्याला कुणाला येथे काम करायचं आहे, त्याला हिंदू समाजासाठी काम करावं लागेल, असेही जोशी यांनी पुढे नमूद केले.

भय्याजी जोशी यांनी या विधानावर अधिक स्पष्टीकरणंही दिलं. मी हिंदूंच्या सशक्तीकरणाचा मुद्दा मांडला म्हणजे मी अन्य कोणत्या तरी समुदायाच्या विरोधात आहे, असा अर्थ काढू नये. या देशात प्राधान्याने हिंदूंसाठी काम व्हायला हवं, इतकंच मला म्हणायचं आहे, असे जोशी म्हणाले. हिंदू समाज जातीयवादी कधीही नव्हता. त्यामुळेच हिंदूंसाठी काम करताना कुणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. हिंदू कणखर झाला तर त्याचा अवघ्या विश्वाला फायदा होईल, असेही जोशी म्हणाले. जगाला चांगल्या मार्गाने पुढे नेण्याचे भारताचे कर्तव्य असून हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारल्यास सर्व समस्यांची तड लागेल, असा दावाही जोशी यांनी केला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here