म. टा. प्रतिनिधी, पिंपरी

‘सरकार स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना ‘भारतरत्न’ देणार नाही. त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी सावरकरांना भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर म्हण्यास सुरुवात करायला हवी,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते यांनी व्यक्त केले. ‘टार्गेट करायला आज सर्वांना सावरकरच का सापडतात,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

समर्थ प्रॉडक्शन प्रस्तुत आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित स्वरगंधर्व संगीत महोत्सवामध्ये शरद पोंक्षे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर व्याख्यान दिले. केंद्रप्रमुख वामनराव अभ्यंकर, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ विश्वास मेहेंदळे, नगरसेवक अमित गावडे आदी या वेळी उपस्थित होते.

‘बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य आणि ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी सरकारने दिलेली नाही. तरीही लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले असे म्हणणे रूढ झाले आहे. वि. दा. सावरकर यांना सरकार भारतरत्नही देणार नाही. त्यामुळे आजपासून आपणच भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणण्यास सुरुवात करू,’ असे पोंक्षे यांनी स्पष्ट केले. हिंदुराष्ट्राबद्दल पोंक्षे म्हणाले, ‘जगाचा इतिहास पाहिला, तर ज्या लोकांची संख्या जास्त त्या नावाने त्या-त्या देशाची ओळख आहे. आपल्याकडे ‘निधर्मी राष्ट्र’ अशी घोषणा दिली जाते, पण निधर्मी हा शब्दच नाही. धर्म म्हणजे काय याचा अर्थ कुणीच जाणून घेत नाही. सावरकरांना जन्माधिष्ठित जात मान्य नव्हती. धर्म या विचाराला आज फार संकुचित करण्यात आले आहे. धर्म म्हणजे गुणधर्म. हे गुणधर्म निसर्गाने जन्मजात बहाल केले आहेत. मनुष्य जन्माला येतो तो हिंदू म्हणूनच. मनुष्याच्या जन्मानंतर त्याच्यावर धार्मिक विधी करुन तो कुठल्या जातीचा हे ठरविले जाते. वास्तविक माणुसकीचा धर्म म्हणजे हिंदूधर्म.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पाथरे यांनी केले. सचिन चपळगावकर यांनी आभार मानले.

बदनामीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न

‘सावरकर यांना बदनाम करण्यासाठी काही यंत्रणा जाणीवपूर्वक काम करत आहेत. सावरकर यांना का बदनाम करण्यात येत आहे, याविषयी अभ्यास केला. तेव्हा त्याचे कारण त्यांच्या आडनावात असल्याचे जाणवले. एका मूर्खामुळे सावरकर हा शब्द प्रसिद्ध झाल्याबद्दल त्याचे आभार मानतो,’ असा उपरोधिक टोला लगावून, ‘ज्याला आपल्या आजीचा इतिहास माहिती नाही त्याला सावरकर काय समजणार,’ अशी टीका शरद पोंक्षे यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here