लखनऊ : भारतात सुरू असलेल्या करोना लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेशनं एक पाऊल पुढे टाकलंय. करोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं जाहीर केलंय.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लस टोचून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाच्या दिवशी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस वाढत चाललेलं करोना संक्रमण ध्यानात घेता राज्य सरकारनं इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील, परंतु इथे करोना प्रोटोकॉलचं पालन करणं आवश्यक राहील.

होळीनंतर मुख्यमंत्री यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी एक बैठक घेतली. यामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधात निर्देश दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ६ लाख १५ हजार ९९६ रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यात ९१९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ५ लाख ९८ हजार ००१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात एव्हाना करोनामुळे ८८०० रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here